Vidarbha Irrigation Development Corporation Bharti 2025 : विदर्भ सिंचनातून समृद्ध व्हावा, यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची स्थाप स्थापना करण्यात आली. या महामंडळांतर्गत नागपूर आणि अमरावती विभागात पाच कार्यालये कार्यान्वित केली आहेत; मात्र मंजूर ११ हजार ३९ पदांपैकी केवळ पाच हजार २२२ पदेच भरण्यात आली आहेत. त्यामुळे महामंडळात तब्बल पाच हजार ८१७ पदांचा अनुशेष निर्माण झाला आहे.
विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. शेतकरी आत्महत्येचे सत्र आजही थांबलेले नाही. विदर्भातील शेतकरी खरीप हंगामातच अधिक लागवड करतात. निसर्गाने दगा दिला तर शेतकऱ्यांच्या हाती नुकसानीशिवाय काहीच लागत नाही.
त्यामुळेच विदर्भातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली.
कार्यकारी संचालक विदर्भपाटबंधारे महामंडळ, नागपूर, जलसंपदा विभाग नागपूर, गोसेखुर्द प्रकल्प नागपूर, जलसंपदा विभाग अमरावती, विशेष प्रकल्प जलसंपदा विभाग, अमरावती अशी पाच कार्यालये सुरू करण्यात आली.
महामंडळाच्या पाचही कार्यालयांतर्गत विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दूर करणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला. प्रत्यक्षात कामकाजाचा डोलारा सांभाळण्यासाठी मंजूर केलेल्या पदांपैकी तब्बल ५० टक्क्यांहून अधिक रिक्त पदे असल्याने कार्यरतांवर ताण वाढला आहे. नागपूर आणि अमरावती या दोन्ही विभागात रिक्त पदांची मोठी संख्या असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे.
स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांची सर्वाधिक पदे रिक्त स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांची तब्बल एक हजार ५४ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात २३५ सहायक कार्यरत असून, सुमारे ८१९ पदे रिक्त आहेत.
कार्यकारी अभियंत्यांची ५७ पैकी ४६ पदेच कार्यरत असून, ११ पदांचा अनुशेष आहे. उपकार्यकारी अभियंत्यांचीही ३६ पैकी ११ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत २५ अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे.