Land Satbara Utara update: शेती किंवा बिनशेती जमीन खरेदी करताना अनेकजण केवळ जागेचा दर, लोकेशन आणि विक्रेत्याच्या शब्दांवर विश्वास ठेवून व्यवहार करतात. मात्र, या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज असतो. सातबारा उतारा या कागदात जमिनीची मालकी, उपयोग, कोणती अट आहे का, कोणते हक्क लागू आहेत.
यासारख्या नोंदी स्पष्टपणे नमूद असतात. पण दुर्दैवाने अनेक वेळा “शर्त” आणि “धारणप्रकार” या महत्त्वाच्या नोंदींकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना आर्थिक आणि कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागते.
शेती जमिनीचे प्रकार, काय समजून घ्यायला हवे ?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 नुसार जमिनीचे खालील तीन मुख्य प्रकार आहेत.
जुनी शर्तीची जमीन (वर्ग 1)
ही जमीन पूर्णपणे खासगी मालकीची असते. शेतकऱ्याला या जमिनीचा व्यवहार करताना कोणत्याही शासकीय परवानगीची आवश्यकता नसते. सातबाऱ्यावर “खा” असा उल्लेख दिसतो.
नवीन शर्तीची जमीन (वर्ग 2)
अशा जमिनी राज्य सरकारकडून वतन, इनाम, पुनर्वसन किंवा भूसंपादनाअंती देण्यात येतात. यावर व्यवहार करताना सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक असते. सातबाऱ्यावर “शर्त लागू” किंवा तत्सम शब्द वापरलेले असतात.
राज्य पट्टेदार जमीन
ही जमीन केवळ वापरासाठी दिली जाते. विक्री किंवा हस्तांतरण करण्यासाठी यावर कडक अटी असतात आणि परवानगीशिवाय व्यवहार केल्यास जमीन जप्त होऊ शकते.
सातबाऱ्यावर ‘शर्त’ आणि ‘धारणप्रकार’ असायलाच हव्यात
जमिनीच्या कायदेशीर स्थितीचा संपूर्ण अंदाज सातबाऱ्यावरूनच येतो. जर ‘शर्त’ किंवा ‘धारणप्रकार’ची नोंद नसेल, तर त्या जमिनीवर कोणते निर्बंध आहेत, हे ठरवता येत नाही. यामुळे विक्री व्यवहार अडचणीत येतो. शासनाचा हिस्सा भरावा लागतो. जमीन रद्दबातल ठरू शकते. न्यायालयीन खटले उभे राहतात.
विशेषतः नवीन शर्तीच्या जमिनीवर व्यवहार करताना शासनाची परवानगी नसेल, तर तो व्यवहार बेकायदेशीर ठरतो. असे व्यवहार भविष्यात जमीन जप्ती किंवा मालकी नाकारण्याच्या स्थितीपर्यंत जाऊ शकतात.
ज मीन खरेदी करताना ‘ही’ खबरदारी घ्या
सातबाऱ्यावर शर्त आणि धारणप्रकार नमूद आहेत का हे तपासा
शासकीय अट असल्यास महसूल अधिकाऱ्याची लेखी परवानगी आहे का?
व्यवहाराचे सर्व कागदपत्रे कोणत्याही कायदेशीर सल्लागाराकडे तपासून घ्या
विक्रेत्याजवळ सर्व आवश्यक परवाने व मंजुरी आहेत का?
कुठे चौकशी कराल ?
जर सातबाऱ्यात काही शंका असेल, तर तालुक्यातील तहसील कार्यालय, भूमी अभिलेख विभाग, किंवा जिल्हा निबंधक कार्यालयात चौकशी करा. याशिवाय, ऑनलाइन सातबारा उतारा पाहण्यासाठी mahabhulekh.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलचा वापर करा.