रक्षाबंधनाची खास भेट! मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ‘लाडकी बहीण’ योजनेच्या रकमेत कधी होणार वाढ
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेतून गरजू महिलांच्या खात्यात दरमहा थेट आर्थिक मदत जमा केली जाते. निवडणुकीदरम्यान काही नेत्यांनी या रकमेत वाढ करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप ती वाढ झालेली नव्हती.
रक्षाबंधनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेतील वाढीबाबत भूमिका स्पष्ट केली.
फडणवीस म्हणाले, “लाडक्या बहिणींसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. पण काही जणांनी या योजनेत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. काहींनी कोर्टात योजनेविरोधात याचिका दाखल केली, तर काहींनी भ्रष्टाचाराचे खोटे आरोप लावले. प्रत्यक्षात या योजनेतील रक्कम थेट बहिणींच्या बँक खात्यात जमा होते, त्यामुळे भ्रष्टाचाराचा प्रश्नच नाही.”
ते पुढे म्हणाले, “प्रामाणिक लाभार्थी भगिनींना हा लाभ मिळत राहील. कोणी काहीही बोललं तरी बहिणींचा आशीर्वाद खऱ्या भावांसोबतच असतो. जे सावत्र भावांसारखं वागतात, त्यांना बहिणी थारा देणार नाहीत.”
योजनेतील निधी वाढीबाबत फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गावर चालत आम्ही ही योजना पुढील पाच वर्षे सुरू ठेवणार आहोत आणि योग्य वेळी तिच्या निधीत वाढही करू.”