IMD Weather Forecast : महाराष्ट्रात तुफान पाऊस, पाच दिवस धोक्याचे, हवामान खात्याचा अंदाज
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या अंदाजामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
हवामान विभागाच्या अहवालानुसार, बंगालच्या उपसागरात तसेच दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या हवामान प्रणालीमुळे 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीत आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः 18 ते 20 ऑगस्टदरम्यान महाराष्ट्रातील विदर्भ भागात पावसाचा जोर अधिक राहील, त्यानंतर पावसाचा थोडा उघडावा मिळू शकतो, मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच राहील.
याशिवाय, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि आसाम या राज्यांनाही पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. अनेक भागांत पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेषतः विदर्भ आणि कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आजदेखील कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असून, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागातही पावसाचा अंदाज आहे. पावसाचा जोर वाढल्यास पूरस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.