महाराष्ट्रातील 9 राजकीय पक्षांची मान्यता रद्द; केंद्रीय निवडणूक आयोगाची कारवाई

महाराष्ट्रातील 9 पक्षांसह देशातील 334 राजकीय पक्षांची मान्यता रद्द; केंद्रीय निवडणूक आयोगाची कारवाई
केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत देशभरातील तब्बल 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. यात महाराष्ट्रातील 9 पक्षांचा समावेश असून, सर्वाधिक उत्तरप्रदेशातील 114 आणि दिल्लीतील 27 पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
ही कारवाई लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 29अ अंतर्गत करण्यात आली आहे. निवडणुकीचे नियम पाळण्यात अपयशी ठरलेले हे पक्ष, सलग 6 वर्षे निवडणूक न लढविणे किंवा पक्षातील बदलांची माहिती आयोगाला न देणे, अशा कारणांमुळे अपात्र ठरले. यामुळे देशात आता फक्त 6 राष्ट्रीय आणि 67 प्रादेशिक पक्ष उरले आहेत.
दोन महिन्यांपूर्वीच आयोगाने देशातील 345 पक्षांची चौकशी करण्याचे आदेश संबंधित राज्यांच्या अधिकाऱ्यांना दिले होते. तपासादरम्यान असे आढळले की, 334 पक्षांनी आयोगाच्या नियमांचे पालन केलेले नव्हते. परिणामी त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील मान्यता रद्द झालेले पक्ष
अवामी विकास पार्टी, बहुजन रयत पार्टी, भारतीय संग्राम परिषद, इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया, नवभारत डेमोक्रेटिक पार्टी, नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी, पीपल्स गार्डियन, लोक पार्टी ऑफ इंडिया आणि युवा शक्ती संघटना.