Mumbai News: मंत्रालयात प्रवेशासाठी मॅन्युअल प्रवेश पास बंद – 15 ऑगस्टपासून नवा नियम लागू, आदेश जारी
राजधानी मुंबईतील मंत्रालयात प्रवेश घेण्यासाठी आता केवळ डिजिटल प्रवेश पत्र आवश्यक असेल. यासाठी राज्य सरकारने ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाइन ॲप-आधारित प्रणालीची अंमलबजावणी केली आहे. या माध्यमातून प्रवेश पास घेतल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही. गृह विभागाने 11 ऑगस्ट रोजी यासंदर्भात आदेश जारी केले असून, यापूर्वी असलेली मॅन्युअल प्रवेश पास देण्याची पद्धत पूर्णतः बंद करण्यात आली आहे.
मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांसाठी नवी अट
मंत्रालयात रोज महाराष्ट्राच्या विविध भागांतून नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी भेटी देतात. मात्र, आता मंत्रालयाचे दार सहजपणे ठोठावता येणार नाही. 15 ऑगस्टपासून लागू होणाऱ्या नव्या कार्यपद्धतीनुसार, प्रवेश मिळविण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड यांसारखे शासनमान्य ओळखपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
स्मार्टफोन नसलेल्यांसाठी विशेष सुविधा
ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही किंवा जे अशिक्षित आहेत, अशा अभ्यागतांसाठी गार्डन गेट येथे ‘डिजीप्रवेश’ ॲपच्या माध्यमातून नोंदणी करण्यासाठी आणि आवश्यक मदत मिळविण्यासाठी एक खिडकी केंद्र उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे, आता मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी नागरिकांना डिजिटल पद्धती स्वीकारावी लागणार आहे.
‘डिजीप्रवेश’ ॲपद्वारे नोंदणी कशी करावी?
‘डिजीप्रवेश’ हे ॲप ॲण्ड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्रणालींवर उपलब्ध आहे.
येथे app डाउनलोड करा
- ॲण्ड्रॉइड वापरकर्त्यांनी Google Play Store वर, तर आयओएस वापरकर्त्यांनी Apple App Store वर digi pravesh शोधून ॲप मोफत डाउनलोड करावे.
- ॲप इन्स्टॉल केल्यानंतर, केवळ एकदाच नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी करताना आधार क्रमांकाच्या आधारे छायाचित्राची ओळख पडताळणी होईल.
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, संबंधित विभागासाठी स्लॉट बुक करून रांगेशिवाय प्रवेश घेता येईल.
- संपूर्ण प्रक्रिया तीन मिनिटांपेक्षा कमी वेळात पूर्ण होते.